सातारा रोडवरील भुयारी मार्गात लोकांना लुटण्याचा होता प्लॅन : गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या लोकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
करण हरिदास जाधव (वय २४), रवी यल्लप्पा गायकवाड (वय ४२) आणि जयश परशुराम गायकवाड (वय २७, तिघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित नाना चव्हाण (रा. मांजरी) आणि संतोष शरण जाधव (रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार निखील रमेश जाधव यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
युनिट २ चे पथक २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पेट्रोलिंग करीत असताना, पाच जण स्वारगेट ते कात्रज या बस मार्गावरील भापकर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गातून जाणाऱ्या लोकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस हवालदार शंकर नेवसे यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा बीआरटी पीएमपी बसथांब्याजवळ कोपऱ्यात पाच जण थांबून आपसात चर्चा करीत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी विभागून एकत्र छापा टाकला.
त्यावेळी पोलिसांनी तिघांना पकडले, तर दोघे जण पळून गेले. त्यांच्या ताब्यातून सॅक, लोखंडी सुरा, मिरची पुड, हॅण्डग्लोज, मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंढवा, स्वारगेट तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये पोक्सो, दरोड्याची तयारी, लोकांना लुटमार केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, संजय जाधव, पोलीस हवालदार शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, विजयकुमार पवार, शंकर पवार, संजय आबनावे, पोलीस अंमलदार विनायक वगारे, निखील जाधव, साधना ताम्हाणे, राहुल शिंदे, विनोद चव्हाण, ओमकार कुंभार यांनी केली आहे.
